Pune Crime: घरगुती वादातून पतीने केला पत्नीचा खून, आव्हाळवाडी परिसरातील घटना

पुणे: कौटुंबिक कारणातून झालेल्या वादात दारुच्या नशेत पतीने मुलासमोरच पत्नीला मारहाण करून तिचा पायाने गळा दाबून खून केला. ही घटना गुरूवारी (दि.’31) पहाटे चार वाजताच्या सुमारास माहेर संस्थेजवळ माळवाडी आव्हाळवाडी परिसरात उघडकीस आली आहे.
दिपाली संदीप मोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, दिपाली यांच्या 17 वर्षीय मुलीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती संदीप उत्तम मोरे (वय 41) याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप मोरे याला दारुचे व्यसन आहे. तो कौटूंबिक कारणातून सतत पत्नी दिपाली यांना मद्यप्राशन करून मारहाण करत होता. वाद सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना देखील शिवीगाळ करत असे. 27 ऑगस्ट रोजी संदीप याने घरात वाद केला होता. त्यानंतर बुधवारी (दि.30) रात्री परत तो पत्नी दिपाली यांच्याकडून वाद करून दारु पिण्यासाठी पैसे घेऊन गेला.
रात्री दहा वाजता तो परत आला. परत त्याने पत्नीसोबत वाद केला. तिन्ही मुलांना त्याने एका खोलीत कोंडून ठेवले. तर पत्नीला हॉलमध्ये ओढत नेऊन जोरजोरात मारहाण केली. दिपाली यांच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे मुलांनी त्यांना ओढून घरात नेले. दिपाली मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध झाल्या होत्या. संदीप यानेच कपड्याने त्यांच्या तोंडावरील रक्ताचे डाग पसून फरशी स्वच्छ केली.
कोणाला काही सांगितले तर पाहून घेण्याचा मुलांना दम दिला. त्यानंतर तो त्याच ठिकाणी झोपला. मुलांनी घाबरत सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास मामाला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. मामा आल्यानंतर मुलांनी आईला पाहिले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे, गुन्हे निरीक्षक मारुती पाटील, सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ आरोपी पती संदीप मोरे याला अटक.





