Pune Crime: बनावट कागदपत्रे, खोटी NOC, दुहेरी तारण! HDFC बँकेला 11.47 कोटींचा गंडा; फसवणूक उघड

पुणे – एचडीएफसी बँकेच्या फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे शाखेची तब्बल ११.४७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मे. रोहित सर्व्हिस स्टेशन या फर्मचे भागीदार माणिक बिहाणी, सतिश भुतडा, तसेच जामीनदार व तारणदेणारे रोहित बिहाणी यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी कौशिक सुरेश पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पुणे येथे दिलेल्या जबाबात नमूद केले की, वरील आरोपींनी बँकेकडून पाच कोटींहून अधिक कर्ज घेतले असतानाही, गहाण ठेवलेली मालमत्ता परस्पर सुवर्णयुग सहकारी बँकेकडे तारण ठेवून तिथूनही कर्ज घेतले. हे सर्व एचडीएफसी बँकेच्या संमतीशिवाय व खोट्या एनओसीच्या आधारे करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.
रोहित सर्व्हिस स्टेशनने मार्च २०१७ मध्ये एचडीएफसी बँकेतून व्यवसायासाठी ओव्हरड्राफ्ट आणि मुदत कर्ज स्वरूपात ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कालांतराने कर्ज थकले आणि बँकेने ते एनपीए म्हणून वर्गीकृत केले. त्यानंतरही कोणतीही परतफेड करण्यात आली नाही. उलट, बँकेच्या संमतीशिवाय गहाण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकली गेल्याचे व दुसऱ्या बँकेत तारण ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान हे देखील स्पष्ट झाले की, सुवर्णयुग सहकारी बँकेत कर्ज घेण्यासाठी एचडीएफसी बँकेची बनावट एनओसी सादर करण्यात आली होती. तसेच खोटी पोलीस तक्रार करून दस्तऐवजांची डुप्लिकेट प्रत मिळवून फसवणूक करण्यात आली. या सगळ्या प्रकारातून बँकेचे एकूण ११.४७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.





