Pune Crime : मालकाच्या घरात डल्ला मारणाऱ्या चालकाला बेड्या; १५ लाखांचे साेने हस्तगत
Pune Crime : घराची जादा चावी चालकाकडे असणे ठरले धोकादायक; मुलाच्या प्रकृतीचे कारण सांगत दागिने चोरून चालक झाला होता पसार.

Pune Crime – पैसे चाेरीच्या आराेपानंतर काढून टाकलेल्या चालकाला परत एका समारंभासाठी बाेलावले असता याचा फायदा घेत त्याने घरातील तब्बल १५ लाखांचे साेन्या-चांदीचे दागिने चोरले होते. या आराेपीला विमानतळ पाेलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १५ लाखांचे साेने हस्तगत करण्यात आले आहे. राजेश परशुराम कांबळे (४०, रा. कलवड वस्ती, लाेहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.
याप्रकरणी फारुख अब्दुल हमीद हमदुले (५७ , रा. काेनार्क कॅम्पस, विमाननगर) यांनी विमानतळ पाेलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे हा तक्रारदार यांच्या कारवर चालक होता. नाेव्हेंबर २०२५ मध्ये तक्रारदार यांच्या घरातून आणि वाहनातून पैसे चाेरीला गेल्याने कांबळेला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तक्रारदार हमदुले यांच्या भाचीचा सारखरपुडा असल्याने त्याला परत बोलविण्यात आले हाेते.
कार्यक्रमाला तक्रारदार यांच्या आईला घेऊन गेला, परंतु मुलाची तब्येत बिघडल्याचे सांगून परत निघून आला हाेता. हमदुले यांच्या घराची एक चावी आराेपी कांबळे याच्याकडे हाेती. याचा फायदा घेत त्याने हमदुले यांच्या आईचे १५ लाख किमतीचे दागिने चाेरले हाेते. ते साेने वितळुन त्यांची लगड केली हाेती. कांबळे याला विमानतळ पाेलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याकडून तक्रारदार यांच्या १५ लाखांच्या सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पाेलिस निरीक्षक गाेंविध जाधव, पाेलिस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके, पाेलिस उपनिरीक्षक नितीन राठाेड, पाेलिस अंमलदार लालू कऱ्हे, अकुंश जाेगदंडे, राहुल जाेशी, रुपेश पिसाळ यांच्या पथकाने केली.





