Pune Airport – पुणे विमानतळावर भारतीय हवाई द एका फायटर विमानाचे लँडिंग करताना अंडरकॅरेज (लँडिंग गियर) मध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे विमान रन-वे वरच अडकून पडले आणि धावपट्टी पूर्णपणे बंद झाली. शुक्रवारी (दि.१७)रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या आपघातात दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली. मात्र, पुणे विमानतळाचा रन-वे तब्बल नऊ तास बंद ठेवल्यामुळे आगमन आणि निर्गमन करणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड किंवा आपत्कालीन परिस्थितीमुळे वैमानिकांना कधी-कधी हार्ड लँडिंग करावी लागते. या प्रकरणातही विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले, ज्यामुळे मोठा अपघात टाळता आला. विमान जागेवरच अडकून पडले होते. मात्र, दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. विमानाच्या स्थितीमुळे आणि त्याच्या नुकसानीमुळे तातडीने नोटीस टू एअरमेन (एनओटीएएम) जारी करण्यात आला. त्यानुसार रन-वे शनिवारी (दि.१८) पहाटे साडेपाच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रन-वे वरील विमान सुरक्षितरीत्या हटविणे, तपासणी व रनवेची दुरुस्ती करता येईल. पुणे विमानतळ. अखेर पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी विमान रनवेवरून हटवण्यात यश आले. त्यानंत सर्व तपासणी झाल्यावर पुणे विमानतळावरुन सकाळी साडेसात वाजता विमानांचे निर्गमन उड्डाणे सुरु करण्यात आली तर सकाळी ८ वाजता आगमन उड्डाणे सुरू करण्यात आली. या घटनेमुळे विमानसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अनेक विमानांना वळविण्यात आले, त्यामध्ये इंडिगोची आठ, एअर इंडियाचे एक, आकासा एअरचे एक आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची दोन विमाने यांचा समावेश होता. याशिवाय मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द झाली. इंडिगोची ३५ आगमन व ३८ निर्गमन उड्डाणे, एअर इंडियाची ३-३, स्पाइसजेटची २ आगमन व ३ निर्गमन, आकासा एअरची २ आगमन व ३ निर्गमन तसेच एअर इंडिया एक्स्प्रेसची ५ आगमन व ५ निर्गमन उड्डाणे रद्द करण्यात आली. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळ प्रशासनाने पिण्याचे पाणी, चहा, कॉफी तसेच अल्पोपहाराची व्यवस्था केली. सीआयएसएफ आणि एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या पथकांनी प्रवासी व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रण सुरळीतपणे हाताळले. विमान कंपन्यांनी प्रवाशांशी समन्वय साधून उशीर, रद्द व वळविण्यात आलेल्या उड्डाणांबाबत माहिती दिली असून विमानसेवा आता पूर्णपणे पूर्ववत झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. “हवाई दलाच्या एका फायटर विमानाचे लँडिंगच्या घटनेनंतर तत्काळ धावपट्टी बंद करण्यात आली. तसेच धावपट्टी पूर्णपणे मोकळी करून नियमित सेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. सुरक्षा उपायांना सर्वोच्च प्राधान्य देत धावपट्टी कामे पूर्ण करुन विमानसेवा सकाळी साडेसात वाजता नियमितपणे सुरू झाली.” – मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक