Pune Crime | साताऱ्यातील सराईत गुन्हेगार मंचर पोलिसांकडून जेरबंद

प्रभात वृत्तसेवा
मंचर – सातारा शहर येथे चोरी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगार अभिजीत सोमनाथ बिडकर (रा.जुना बैलबाजार, मंचर ता.आंबेगाव) यास मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले,अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.
शनिवार, दि.१६ रोजी वेदांत शांतारा आरूडे (रा.कळंब ता.आंबेगाव), महेश दत्तात्रय मंगळवेढेकर, (रा.मंचर ता. आंबेगाव), अभिजीत सोमनाथ बिडकर (रा.जुना बैलबाजार, मंचर ता. आंबेगाव) हे तिघेजण सातारा शहरात घरफोडी चोरी करण्यासाठी गेले होते.
रात्रीच्या वेळी सातारा शहारातील एका इमारतीमध्ये वेदांत आरूडे व महेश मंगळवेढेकर हे दोघेजण चोरी करण्यासाठी गेले असता इसम नामे अभिजीत बिडकर हा लक्ष ठेवण्यासाठी इमारतीच्या बाहेर थांबलेला होता.चोरी करीत असताना इमारतीमधील नागरिक जागे झाल्याने वेदांत आरूडे हा इमारतीचे टेरेसवर पळत गेला व महेश मंगळवेढेकर याला सोसायटीतील लोकांनी इमारतीमध्येच पकडले.
वेदांत आरूडे हा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उतरत असताना तो इमारतीवरून खाली पडून मृत्यू झालेला आहे. अभिजीत बिडकर हा घटनास्थळावरून फरार झाला होता. या बाबत सातारा शहर पोलीस ठाणे जि. सातारा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला अटक करण्याची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भोरवाडी फाटा येथे अटक..
दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपी अभिजीत बिडकर हा फरार झालेला असून त्याचा मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेण्यात यावा,असे सातारा शहर पोलीस ठाण्याने फोनव्दारे कळविल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस अंमलदार योगेश रोडे, अजित पवार, हनूमंत ढोबळे यांनी फरार आरोपीचा शोध घेत असताना
फरार आरोपी अभिजीत बिडकर हा मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोरवाडी फाटा येथे पुणे-नाशिक हायवे रोडवर खेड बाजूकडून येत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने घटनेची हकीकत सांगून गुन्ह्याची कबूली दिली आहे.आरोपी अभिजीत बिडकर याची पुढील तपासकामी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.





