प्रभात वृत्तसेवा पुणे – मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वडगाव मावळ न्यायालयातील सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निकाल दिला.योगेश कैलास जाधव (वय ३३, रा. चंदनवाडी, चांदखेड, मावळ) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल होता. चांगुणा योगेश जाधव यांचा खून झाला होता. याबाबत चांगुणा यांचे वडील शिवाजी दामू ठाकूर (वय ४५, रा. परंदवाडी, मावळ) यांनी फिर्याद दिली होती. योगेश हा चांगुणा यांच्याशी मुलगी झाली म्हणून नेहमी वाद घालून मारहाण करत असे. २८ ऑगस्ट २०२१ ला अशाच वादामध्ये त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला होता. या खटल्याचे कामकाज सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांनी पाहिले. ॲड. चौगुले यांनी या खटल्यामध्ये परिस्थितीजन्य व वैद्यकीय पुराव्याअन्वये आठ साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर केले, तसेच गुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यात त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात आणि शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील, तत्कालीन तपास अधिकारी उपनिरीक्षक संदीप गाडिलकर यांच्या मार्गदर्शनानुसार कोर्ट पोलीस अंमलदार अविनाश हरी गोरे व पोलीस शिपाई शिल्पा माळी यांनी सदर खटल्यामध्ये न्यायालयामध्ये पाठपुरावा केला.