Hospital fire in Pakistan: इस्लामाबादमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! सरकारी रुग्णालयात भीषण आग; 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
Hospital fire in Pakistan: भारतानंतर आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका सरकारी रुग्णालयात भीषण आग लागली आहे.

Hospital fire in Pakistan: भारतानंतर आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका सरकारी रुग्णालयात भीषण आग लागली आहे. या लागलेल्या भीषण आगीत किमान १५ नवजात बालकांचा मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) च्या स्त्रीरोग विभागातील नर्सरीमध्ये ही आग लागली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी नर्सरीमध्ये १६ नवजात बालकांना दाखल करण्यात आले होते. यापैकी केवळ एका बाळाला सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर १५ जणांचा मृत्यू झाला.
बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या नर्सरीमध्ये एअर कंडिशनरच्या कंप्रेसरचा स्फोट झाल्याने आग लागली. आग वेगाने पसरली आणि संपूर्ण वॉर्ड धुराने भरून गेला.
रुग्णालयाच्या माता व बाल आरोग्य (MCH) वॉर्डच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, या घटनेत १४ मुलांचे मृतदेह पूर्णपणे जळाले. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
बचाव कार्यासाठी सहा अग्निशमन दलाच्या गाड्या आणि चार रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले, त्यानंतर आग पुन्हा भडकू नये यासाठी घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालय आणि आजूबाजूच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
नवजात बालकांच्या मृत्यूमुळे रुग्णालयातील कुटुंबीय अत्यंत शोकाकुल झाले होते. जिल्हा प्रशासनाने या घटनेचे कारण आणि त्यातील निष्काळजीपणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ही समिती आगीचे नेमके कारण, घटनेच्या सभोवतालची परिस्थिती आणि रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का, हे निश्चित करेल.






