Shilpa Gavare Case : शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती; ‘तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा माग….’
Shilpa Gavare Case : वाकडमध्ये 32 वर्षीय शिल्पा गवारे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. माहेरच्या संपत्तीच्या मागणीवरून छळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप असून पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल आहे.

Shilpa Gavare Case : पिंपरी चिंचवड येथील वाकड परिसरातील एका कुटुंबात 32 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. माहेरच्या संपत्तीमध्ये हिस्सा घेऊन येण्यासाठी तिच्यावर सासरच्या मंडळींकडून दबाव आणला जात होता, तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
शिल्पा यांचा विवाह वाकड येथील गवारे कुटुंबात झाला होता. लग्नानंतर काही काळातच माहेरच्या संपत्तीवरून तिचा छळ सुरू झाल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ‘तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये तुझा हिस्सा मागून घे’, अशी मागणी तिच्याकडे केली जात असल्याचा आरोप आहे. याच कारणावरून तिला मारहाण आणि शिवीगाळही केली जात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
शिल्पाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी पती सचिन गवारे, सासरे उत्तम गवारे आणि सासू संजीवनी गवारे यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आईने सांगितला शेवटच्या भेटीचा प्रसंग –
शिल्पाची आई रतन कलाटे यांनी सांगितले की, घटनेच्या आदल्या दिवशी शिल्पा कपडे बदलण्यासाठी माहेरी आली होती. मात्र, घरी स्वयंपाक करायचा असल्याचे सांगून ती पुन्हा सासरी गेली. त्यानंतर पतीसोबत तिचा वाद झाल्याचे कुटुंबीयांना समजले.
कलाटे यांच्या आरोपानुसार, शिल्पाला यापूर्वीही मारहाणीचा त्रास सहन करावा लागला होता. तिने मात्र अनेकदा दुखापतीचे कारण घरातील वस्तू लागल्याचे सांगून हा त्रास लपवला होता. गेल्या काही दिवसांत तिने कुटुंबीयांना याबाबत सांगण्यास सुरुवात केली होती, असे तिच्या आईने म्हटले आहे.
‘आज सुधारेल, उद्या सुधारेल’, अशी कुटुंबाची अपेक्षा –
शिल्पाच्या भावाने सांगितले की, ती अत्यंत संयमी स्वभावाची होती. काही दिवसांपूर्वी तिने माहेरच्या संपत्तीच्या वादाबाबतही त्यांच्याशी चर्चा केली होती. ‘भाऊ, तू जिथे सांगशील तिथे मी सही करते; मला भाऊ-बहिणीचे नाते जपायचे आहे’, असे ती म्हणाल्याचा दावा भावाने केला.
पतीकडून मारहाण होत असल्याचेही भावाने सांगितले असून, काही दिवसांपूर्वी तिच्या डोक्याला इस्त्री लागल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने शिल्पाच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.





