Pune Crime: जिम मधील तरुणांना बेकायदेशीरपणे स्टेरॉईड इंजेक्शन विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

पुणे – पुणे शहरातील विविध जिम मधील व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी चांगल्याप्रकारे व्हावी याकरिता स्टेरॉईड इंजेक्शन मेफेटर्मिन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीररित्या विक्री केल्याप्रकरणी दोन जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातून पाच हजार रुपयांचे बेकायदेशीर 14 स्टेरॉईड इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी माहिती दिली की, याप्रकरणात दीपक बाबुराव वाडेकर (वय -32, राहणार- खडकी, पुणे) व साजन अण्णा जाधव (वय- 25, राहणार- औंध ,पुणे )यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपी विरोधात पोलीस हवलदार तेजस रमेश चोपडे यांनी तक्रार दाखल केलेली आहे.
संबंधित आरोपी हे नतावाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कार मध्ये बेकायदेशीर स्टेरॉईड इंजेक्शन घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर आरोपींकडे औषधे बिल नसताना औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवीतास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहिती असताना देखील, संबंधित औषधे अवैधरीत्या प्राप्त करून गैरवापर करण्याचे उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या कब्जात बाळगल्याचे दिसून आले आहे.
संबंधित इंजेक्शन त्यांनी कोठून आणली आहेत, ते कोणाला विक्री करणार होते, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत, याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.





