Pune Crime: पोलीस अधिकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या RTI कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

पुणे – पुणे शहरातील आयपीएस अधिकाऱ्यांशी जवळीक साधत, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यावर खडक पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यकर्त्याला पोलीस आयुक्तालयात सहज प्रवेश मिळत होता. तेथे आयपीएस अधिकाऱ्यांशी गाठीभेटी घेत छायाचित्रे काढून तो त्यांच्या जवळचा असल्याचे भासवत होता.
ललित सत्यवान ससाणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर अगोदर खडकी, चतु:श्रृंगी आणि फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दोन गुन्हे खुनाच्या प्रयत्नाचे आणि आर्म ॲक्टचे आहेत. प्रसाद प्रकाश शेलार (३७, रा.घोरपडे पेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादीचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. ते १३ फेब्रुवारीला त्यांचे काका प्रमोद शेलार यांच्या वाढदिवसानिमीत्त घोरपडे पेठ येथे कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम झाल्यावर प्रमोद शेलार तेथून निघुन गेले. दरम्यान कार्यक्रमाला आलेले अभिषेक ससाणे व रोहन शेडगे हे घरी जात असताना श्रीनाथ उर्फ टिक्या शेलार याला रस्त्यात भेटले. तेथे त्यांच्यात मारामारी झाली. याप्रकरणी अभिषेक ससाणे याने खडक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
यामध्ये अभिषेक ससाणे हा प्रमोद शेलार यांचेसुध्दा नाव गुन्हयात घ्या असे खडक पोलीस ठाण्यात सांगत असल्याची फिर्यादीला माहिती मिळाली. फिर्यादी पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे अभिषेक ससाणेचा चुलत भाऊ ललित ससाणे हा सुध्दा आला होता. त्याला फिर्यादीने माझे काका प्रमोद शेलार याचा या गुन्हयाशी काहीएक संबंध नाही तुम्ही त्याचे नाव गुन्हयामध्ये ओढू नका अशी विनंती केली. त्यावर ललित ससाणे याने गुन्हयात नाव न घेण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्यास काकासहीत घरादाराला खोट्या केसेस मध्ये अडकवून देइल, अशी धमकी दिली. पुढे तो असेही म्हणाला की, “तुम्ही प्रत्येक पोलीसांना माझी माहिती विचारा ते तुम्हाला माझ्याबद्दल सांगतील की, मी कोण आहे? कसा आहे? माझे पुणे शहरात मोठे संबंध आहेत. मी मोठ-मोठया पोलीस अधिका-यांना सस्पेंड करवले आहे. सगळे पोलीस मला दचकुन असतात, त्यामुळे मी केलेली पैशांची मागणी लवकरात लवकर पुर्ण करा.”
ललित ससाणेची अनेक आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही दहशत होती. तो भेटायला आल्यावर त्याला कार्यालयाबाहेर सोडण्यासाठी अनेकदा पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षकाला पाठवले जायचे. त्याचा कार्यालयात यथेच्छ पाहुणचारही केला जायचा. यामध्ये इतर कनिष्ठ अधिकारीही त्याला घाबरुण होते. यामुळे मागील काही वर्षात त्याने अनेक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना वेठीस धरले होते. यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.





