पुणे – ओळखीच्या व्यक्तिला पैसे देण्याकाठी गेलेल्या एका व्यावसायिकावर टोळक्याने कोयत्याने वार करुन त्यांच्याकडील रोकड लुटली. या घटनेत व्यावसायिक गंभीर जखमी झाले. हि घटना सोमवारी साडे आठ वाजता महमदवाडीतील सय्यदनगर येथे घडली.
याप्रकरणी मुजीब गालिब तांबोळी ( वय 25, रा. मंगळवार पेठ) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आठ ते दहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे कोंढवा येथे घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे.
त्यांच्या दुकानात अफसान शेख नावाचा मुलगा कामाला होता. तांबोळी यांनी काही दिवसांपुर्वी अली मोहमद शेख या व्यक्तीकडून 27 हजार 500 रुपये किंमतीचे जुने एलईडी टीव्ही मागील आठवड्यात खरेदी केले होते. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना त्याचे त्याचे पैसे देणे बाकी होते. सोमवारी पारशी नववर्षानिमित्त त्यांचे दुकान बंद होते. त्यामुळे त्यांनी सोमवारी अली शेख यांना पैसे देण्यासाठी फोन केला. तेव्हा त्यांना उशीर होणार असल्याचे सांगितल्याने तांबोळी हे त्यांच्या दुकानात काम करणारा अफसानच्या घरी गेले. मात्र तो बाहेर गेल्याने ते त्याच्या सय्यदनगर येथील घराच्या खालीच रस्त्यावर थांबले. तेव्हा हातात कोयते, पालघन घेऊन तेथून जाणाऱ्या टोळक्यातील एकाने तांबोळी यांच्यावर पालघनाने वार केला. त्यानंतर त्यांच्या शरीरावर आणखी वार केले. त्यापैकी एकाने तांबोळी यांना सोडू नका, असे सांगून त्यांना जबर मारहाण केली.
आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल व त्यांच्या खिशातील 27 हजार 500 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. या घटनेनंतर नागरीकांनी घाबरून त्यांची घरे, दुकाने बंद केली. त्यानंतर फिर्यादींनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली.