Pune Crime: पुणे शहरात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या आणि उत्तर प्रदेशात गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. या आरोपींकडून सुमारे ६२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हेगार आंतरराज्यीय ‘सनी’ गँगचे सदस्य आहेत. त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न आणि खंडणीचे अनेक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल आहेत. आरोपी परराज्यात घरफोडी करायला जाताना विमान किंवा रेल्वेचा प्रवासासाठी वापर करत. आकाश सुभाष ( २३ मूळ रहिवासी मेरठ, उत्तर प्रदेश सध्या सुंदरनगरी, दिल्ली) आणि जितेंद्र चतुर्वेदी ( ३२ सुंदरनगरी, दिल्ली) अशी अटक आरोपींची नावे आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात जानेवारी महिण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी घरात नसताना अज्ञात आरोपींनी दरवाजा तोडून घरफोडी केली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. पोलीस अंमलदार आशिष खरात आणि अनिस शेख यांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले असता संशयित आरोपी पुण्यातील विविध भागांत घरफोड्या करत असल्याचे समोर आले. आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येऊन एका लॉजमध्ये थांबले होते आणि त्यानंतर परराज्यात निघून गेल्याचेही तपासात उघड झाले. दरम्यान, पोलिसांनी या आरोपींच्या हालचालींवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. जवळपास महिनाभराच्या तपासानंतर माहिती मिळाली की, सीसीटीव्हीत दिसलेले आरोपी पुन्हा घरफोडीच्या उद्देशाने विश्रामबाग परिसरात आले असून ते ओंकारेश्वर मंदिराजवळ थांबले आहेत. तपास पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना चारही बाजूंनी घेरून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेले दागिने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून ३२ तोळे सोने आणि १२५ ग्रॅम चांदी हस्तगत केली.तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी आकाश सुभाष हा उत्तर प्रदेशातील ‘सनी गँग’शी संबंधित असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि गँगस्टर अॅक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ६ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात आरोपींनी पुणे शहरात विश्रामबाग, समर्थ, खडक आणि भोसरी पोलीस ठाणे हद्दीत एकूण पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात सुमारे ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जन थोरात, नितीन बाबर आणि अर्जुन कुडाळकर यांनी ही कारवाई केली.