Pune Crime : कात्रज बायपासजवळ आढळला पीएमपीमएल बस चालकाचा मृतदेह

पुणे – शहरातील उरुळी देवाचीमधील बाजारेमळा परिसरात रविवारी दुपारी पीएमपीएल चालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गौतम मच्छिंद्र साळुंखे (रा. भेकराईनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. साळुंखे यांच्या चेहNयावर दगडाने ठेचून मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
साळुंखे हे पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपीएल) बदली रोजंदारी चालक म्हणून काम करत होते. त्यांची नियुक्ती स्वारगेट डेपो येथे होती. शनिवारी दिवसभर ते कामावर होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ड्यूटी संपल्यानंतर त्यांनी स्वारगेट डेपोमध्ये गाडी जमा केली. यानंतर ते घरी जाण्यासाठी डेपोबाहेर पडले. मात्र, रात्री उशीरापर्यंत ते घरी पोहचले नाहीत. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी विचारपूस करीत त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, रविवारी दुपारी उरुळी देवाची बाजारेमळा परिसरात स्थानिक नागरिकांना मृतदेह आढळून आला. याबाबची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. यानंतर तात्काळ युनिट सहाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.





