Pune Crime: पिस्तूलाच्या साहाय्याने खुनाचा प्रयत्न करणारे जेरबंद; एक अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

पुणे – देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्राच्या सहाय्याने खूनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. तर, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.४) रात्री ही घटना घडली होती. तिघांनी जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला केल्याचे कबूल केले आहे.
प्रकाश ऊर्फ पक्या तुळशीराम पवार (वय २३, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत राहुल किरण ढोले (रा. गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिर्यादी आणि स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत सचिन माने यांच्यावर देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्राने हल्ला करून खूनाचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान गुन्ह्यातील संशयित हे व्हीआयटी होस्टेल चौक, अप्पर इंदिरानगर परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी पवार आणि दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. आरोपींकडे पिस्तूल कुठून आले आणि यापूर्वी त्याचा वापर झाला आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नाद्रे, गुन्हे निरीक्षक विकास भारमळ, अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, विक्रम सावंत, शंकर संपते, सागर केकाण यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.





