Pune Crime : गटारावरील लोखंडी झाकणे चोरणारे गजाआड

पुणे – कल्याणीनगर भागातील पावसाळी गटारांवरील लोखंडी झाकणे चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सहा झाकणे तसेच रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निलेश विलास पवार (वय २२), सुरेश अनिल पाटोळे (वय ३१), रोमा सुनील पवार (वय ३५, तिघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
महापालिकेच्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून कल्याणीनगर भागात पावसाळी गटारे तयार करण्यात आली. गटारांवरील लोखंडी झाकणांची चोरी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. झाकणे चोरून चोरटे रिक्षातून पसार झाले होते. पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. गस्त घालणारे पोलीस शिपाई अनिल शिंदे आणि अमजद पठाण यांना झाकणे चोरणारे चोरटे नगर रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली. सापळा लावून त्यांना अटक करण्यात आली.
चौकशीत त्यांनी झाकणे चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लोखंडी सहा झाकणे आणि रिक्षा असा ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे शाखेतील निरीक्षक विजयसिंह चौहान, प्रदीप सुर्वे, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, गणेश वाघ, किरण घुटे आदींनी ही कारवाई केली.





