आजारपणामुळे नसिरुद्दीन शाह यांची झाली अशी अवस्था; मुलाने केला फोटो शेअर…

मुंबई – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना २९ जून रोजी मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता एक आठवड्यानंतर नसीरुद्दीन शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नुकताच नसीरुद्दीन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो त्यांचा मुलगा विवान शाह यांनी शेअर केला असून, नसीरुद्दीन यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
या फोटोत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रत्ना पाठकही दिसत आहेत. पोस्ट शेअर करत, ‘बॅक होम’, त्यांना आज सकाळीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय’, अशी माहिती विवान याने दिली आहे.
नसिरुद्दीन शाह यांना निमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्याच्या फुफ्फुसात पॅच असल्याचे आढळले. नसिरुद्दीन शाह यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची पत्नी रत्ना पाठक आणि मुलगा विवान त्यांच्या सोबत होते.





