Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारे 10 चोरटे ‘जेरबंद’

पुणे – पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना गाठून लुटणाऱ्या दहा चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. लोहगाव व खडकी बाजार परिसरात त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्या ताब्यातून दोन रिक्षा, चार मोबाईल व एक सोन्याची साखळी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पाच गुन्ह्याचा छडा देखील पोलिसांनी लावला आहे.
मागील काही दिवसापासून स्टेशन परिसरात नागरिकांना शस्त्राच्या धाकने लुटणे, पत्ता विचारण्याचा बहाणा करून मोबाईल हिसकावने असे प्रकार घडत होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच दिवसापुर्वी प्रवाशाला लुटल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे निरीक्षक अभय महाजन याना जबरी चोरी करणारे संशयित आरोपी खडकी बाजार व लोहगाव परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथके तयार करून दोन्ही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल दहा जणांना अटक केली. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल काळे, हरीष ठाकुर, उपनिरीक्षक अक्षय गोरड, राहुल पवार , अंमलदार गोकुळ परदेशी, संतोष पागार, हरिष मोरे, फिरोज शेख, मंगेश बोऱ्हाडे, अनिल कुसाळकर, रुपेश पिसाळ, सागर घोरपडे, किरण तळेकर, सागर जगताप, अंकुश खानसोळे, गौरव उभे, गौतम कांबळे, शरद ढाकणे यांच्या पथकाने केली.





