Pune Cricket Talent Hunt 2026 : पुण्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी; १५ मे रोजी हडपसरमध्ये रंगणार ‘टॅलेंट हंट’ स्पर्धा
Pune Cricket Talent Hunt : या निवड प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे PDCL मॅचेस साठी टीम मध्ये सिलेक्शन होणार आहे.

Pune Cricket Talent Hunt Tournament 2026 : “गल्लीतला गोलंदाज ते स्टेडियमचा स्टार” असा प्रवास करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणे जिल्ह्यातील तरुण क्रिकेटपटूंसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पुणे जिल्ह्यातील १४ ते १९ वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींसाठी येत्या १५ मे २०२६ रोजी एका विशेष क्रिकेट टॅलेंट हंट आणि इव्हॅल्युएशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर येथील किंग्स स्पोर्ट्स क्लबमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
प्रोफेशनल स्पीड गनने होणार गोलंदाजीची चाचणी –
या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सहभागी खेळाडूंच्या गोलंदाजीचा वेग मोजण्यासाठी ‘प्रोफेशनल स्पीड गन’चा (Speed Gun Evaluation) वापर केला जाणार आहे. यामुळे खेळाडूंना आपला नेमका वेग आणि ताकद किती आहे, याचे शास्त्रोक्त मूल्यमापन करून घेता येईल. गोलंदाजीसोबतच फलंदाजीतील कसब (Batting Talent) दाखवण्यासाठीही खेळाडूंना व्यासपीठ मिळणार आहे. या निवड प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पुणे डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप लीग (PDCL) मॅचेस साठी टीम मध्ये सिलेक्शन होणार आहे.
दिग्गज खेळाडूंची उपस्थिती आणि निवड समिती –
या कार्यक्रमाला भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू अनुजा पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुण खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच, खेळाडूंची निवड आणि मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र रणजी करंडकातील माजी खेळाडू हेमंत किणीकर, सुदेश लाटे आणि माजी राज्यस्तरीय खेळाडू रोहिणी तबीब हे निवड समितीचे (Selector Panel) काम पाहणार आहेत. अनुभवी प्रशिक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची ही खेळाडूंना दुर्मिळ संधी असेल.
नोंदणी आणि इतर तपशील –
हा कार्यक्रम १५ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून हडपसर येथील पुणे-सोलापूर हायवेवर, पोदार स्कूलच्या समोर असलेल्या किंग्स स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरू होईल. स्पर्धेमध्ये खेळाडूंना प्रोफेशनल क्रिकेट प्लॅटफॉर्म, मीडिया कव्हरेज आणि विशेष सन्मान मिळणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंची संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी ७०५७४५६३७७ किंवा ७५०७२५६२३३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.






