महापालिकेची कारवाई ; १७,५०० चौ.फुट क्षेत्र रिकामे येरवडा – पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने बुधवारी (दि. २९) खराडी परिसरात अतिक्रमणांविरोधात मोठी मोहीम राबवून अनधिकृत बांधकामांवर थेट हातोडा टाकला. चंदननगरमधील जुना मुंढवा रस्ता ते संघर्ष चौकापर्यंतच्या गोविंदसागर सोसायटी परिसरातील प्रसिद्ध खाऊ गल्लीत महापालिकेने धडक कारवाई करीत सुमारे १७ हजार ५०० चौ.फुट क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. हॉटेल आणि किराणा मालाचे दुकान, स्नॅक्स सेंटर इत्यादी अनधिकृत बांधकामे आणि इमारतीसमोरील बांधकाम अंदाजे १७ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रावरील पाडण्यात आले. महापालिका बांधकाम विकास विभाग झोन क्र. १ यांच्यामार्फत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत बांधकाम विकास विभाग झोन क्र. १ कार्यकारी अभियंता सुरेश साखळे, उपअभियंता विवेक डुब्बेवार, कनिष्ठ अभियंता उमेश गोडगे व आरेखक योगेश गुरव यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. ही कारवाई केल्यानंतर नागरिकांनी कृपया दर्शनी सामायिक अंतरामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम व पत्राशेड उभारू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बांधकाम विभागाने दिला आहे.