पुणे – जिल्ह्यातील सर्व २१ सिंचन प्रकल्पांमधील भूसंपादन, तसेच वाटप आदेशाचे डिजिटायझेशन करण्यात येत असून, आतापर्यंत वरसगाव आणि पानशेत प्रकल्पांच्या सुमारे ७६ हजार कागदपत्रांची माहिती अक्षय अभिलेख या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांची अचूक माहिती हाती येणार आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त म्हणून दुबार लाभ घेतलेल्यांची माहिती उघड होणार असून, तसेच दुबार लाभ घेण्याच्या प्रकारांना चाप बसणार आहे. अक्षय अभिलेख या मोहिमेत पहिल्या टप्प्यात कुकडी, वरसगाव, पानशेत आणि चासकमान या चार प्रकल्पांमधील बाधितांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. दुसऱ्या टप्प्यात अन्य १७ प्रकल्पांचा समावेश केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या प्रकल्पात आतापर्यंत चारही प्रकल्पांची २ लाख ३८ हजार १५८ कागदपत्रांची स्कॅनिंग पूर्ण झाली आहे. त्यातील वरसगाव आणि पानशेत प्रकल्पातील कागदपत्रांचे स्कॅनिंग करून त्याचीही माहितीही अपलोड केली आहे. वरसगावच्या १७ हजार ७०२, तर पानशेतच्या ५८ हजार ७७७ कागरदपत्रांची माहिती अपलोड झाली आहे. पहिल्या टप्प्यातील चासकमान आणि कुकडी या प्रकल्पांच्या कागदपत्रांची माहिती अपलोड करण्याचे काम येत्या महिनाभरात पूर्ण होईल, अशा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात कमी भूसंपादन आणि कागदपत्रे असलेल्या प्रकल्पांचे काम होणार आहे. त्यात भामा आसखेड, गुंजवणी, टेमघरसह एकूण १७ प्रकल्पांचा समावेश आहे. शासनाची फसवणूक टळणार या प्रकल्पात जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची व त्यातील बाधितांच्या माहितीचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. त्यात प्रकल्पनिहाय बाधितांची यादी, तसेच त्यांना दिलेला मोबदला याची एकत्रित माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एखादा प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यास तो खरेच बाधित आहे का, त्याला यापूर्वी मोबदला मिळाला आहे का, याची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. यातून सरकारची फसवणूकही टळणार आहे.