पुणे : कोवॅक्सिनची सप्टेंबरपासून चाचणी

* मांजरी येथे भारत बायोटेक करणार लसीचे उत्पादन
* चाचणी अहवालानंतर प्रत्यक्ष लस निर्मिती
* दुसऱ्या लसीचे उत्पादनही होणार पुण्यात
पुणे- करोना साथीला प्रतिबंध करणाऱ्या भारत बायोटेककडून कोवॅक्सिन या लसीचे उत्पादन पुण्यातील मांजरी येथील कंपनीत सुरू होणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लस निर्मितीची प्रायोगिक चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत लसीची निर्मिती करण्यासाठी लागणारे शास्रज्ञ, इंजिनिअरसह इतर आवश्यक ते मनुष्यबळाची उपलब्धता झाली आहे. या कंपनीतील मशिनची तपासणी सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
करोनापासून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. लसउत्पादनाची गरज आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन भारत बायोटेकला राज्यात लस उत्पादन सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाकडून पार पाडण्यात येत आहे.
मांजरी येथील कंपनीमध्ये मशिनरीची तपासणी सुरू आहे. तर, दुसऱ्या बाजुला आवश्यक त्या परवान्या मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. आवश्यक त्या परवानग्या लवकर मिळण्याची आशा आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लसीचे प्रायोगिक चाचणी केली जाणार आहे. प्रायोगिक चाचणीच्या अहवालानंतर प्रत्यक्ष लस निर्मिती केली जाणार आहे.
देशावरील करोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या “इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली.
उच्च न्यायालयाने करोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने या प्रकल्पासाठी या जागेचा ताबा सुद्धा दिला. आता भारत बायोटेककडून लसीचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे काम वेगाने सुरू आहे.





