Pune : सबळ पुराव्याअभावी हत्येचा प्रयत्न केल्याच्या खटल्यातून पाच जणांची निर्दोष मुक्तता
Pune : पुण्यातील दत्तवाडी येथील हत्येचा प्रयत्न प्रकरणात ठोस पुराव्याअभावी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Pune : दत्तवाडी परिसरातील दोन तरुणांवर जुन्या भांडणाच्या कारणातून हल्ला करून हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अमन उर्फ सागर अडगळे, वासिम उर्फ भैया शेख, कुणाल उभे, अनिकेत खोडंगे आणि मयत आरोपी शंकर दाभाडे यांचा यात समावेश आहे.
जून २०१४ मध्ये दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दोन तरुणांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून हत्येचा प्रयत्न, मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी भादंवि कलम ३०७, १४९, १४३, १४७, १४८, ५०४ तसेच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकार पक्षाने साक्षीदार आणि पंच तपासले. मात्र, न्यायालयात आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठोस पुरावे नसल्याचे समोर आले. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश तापकिरे यांनी पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अॅड. ओंकार फडतरे, अॅड. अभिषेक हरगणे, अॅड. ओम तापकीर आणि अॅड. आदित्य पठारे यांनी बाजू मांडली. अॅड. कल्याण लांडगे, अॅड. चैतन्य अभंग, अॅड. मयूर जमदाडे, अॅड. गायत्री पोटवडे आणि अॅड. सुयश वाघचौरे यांनी सहकार्य केले.





