पुण्यात 118 ओमायक्रॉनचे नवे रुग्ण; 2,471 नवीन बाधित

पुणे- शहरात आज नव्याने 2 हजार 471 करोना बाधित सापडले. वाढत्या संसर्गामुळे तपासणीच्या संख्येत वाढ करण्यात आली असून, दिवसभरात तब्बल 19 हजार 186 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. दरम्यान, राज्यात आज ओमायक्रॉनचे एकूण 133 रुग्ण सापडल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये पुणे महापालिकेत सर्वाधिक 118 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीण 3, वसई विरार येथे 3 तर अहमदनगर आणि मुंबईमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला.
वाढत्या बाधित संख्येमुळे पुणे शहरातील बाधित संख्या 11 हजार 550 वर पोहोचली आहे. त्यातील 120 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. तर 19 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहे. दिवसभरात 711 बाधित करोनामुक्त झाले असून, दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात एकूण 41 हजार 343 बाधित सापडले असून, 13 जणांचा मृत्यू झाला आहे.





