Pune: भिडेवाडा स्मारक उभारणीला वेग; निविदा जाहीर

पुणे– क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी बुधवारपेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या जागेवर स्मारक उभारण्यासाठी महापालिकेकडून अखेर आराखडा अंतिम केला असून या कामासाठीची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
सात कोटी २६ लाख ४८ हजार रूपयांचा खर्च अपेक्षीत असून कार्यादेश दिल्यानंतर नऊ महिन्यांच्या कालावधीत स्मारकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी या स्मारकाचे भूमीपूजन करण्याचे शासनाचे नियोजन असल्याने निविदेस केवळ १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
शिवाजी रस्त्यावरील सुमारे पावणेतीन गुंठे जागेतील भिडे वाडा मोडकळीस आला होता. तेथे स्मारक उभारण्याचा निर्णय अनेकदा घेतला गेला. मात्र, वाड्यातील भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतल्याने भूसंपादन रखडले होते. मात्र, उच्च न्यायालयाने योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हेच आदेश कायम ठेवले
. त्यामुळे भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पालिकेने डिसेंबर २०२३ मध्ये तातडीने हा वाडा भुईसपाट करीत जागा ताब्यात घेतली. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून या स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. अखेर सर्व स्मारकांच्या आरखडयाची पाहणी केल्यानंतर शासनाकडून दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत हा आराखडा मंजूर करण्यात आल्याने महापालिकेने प्रत्यक्षात निविदा प्रक्रीया सुरू केली आहे.
असे असेल स्मारक…
– तत्कालिन कालसुसंगत बाह्यरूप
– तळघरात दुचाकींसाठी वाहनतळ
– तीन मजले बांधकाम
– फुले दाम्पत्याचे पुतळे
– फुले यांच्याकार्याविषयी दृकश्राव्य माहिती
– ग्रंथालय व महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कक्ष





