हडपसर – हडपसर परिसरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवरही उलट दिशेने वाहने चालविली जात असल्याने वाहतूक कोंडीचे मोठे कारण ठरत आहे. उलट दिशेने वाहतुकीचे प्रकार वाढत असल्याने हे जीवघेणे ठरत आहे. पोलीस आयुक्तांनी महिनाभरापूर्वीच अशा वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण वाढले आहे. हडपसर परिसरात विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. तसेच, नियमांचे पालन करीत वाहने चालविणाऱ्यांनाही धोका निर्माण होतो आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत. अशा चालकांची वाहने सहा सहा महिन्यांकरिता जप्त करण्याचा नियमही त्यांनी केला होता. यानंतर पहिले १५ दिवस पुणे शहरासह हडपसर परिसरातही वाहतूक पोलिसांकडून अशा कारवाया करण्यात आल्या. मात्र, आता पुन्हा बेशिस्त वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. मगरपट्टा चौक व सातववाडी, गोंधळेनगर येथील सासवड रस्ता परिसरात काही दिवसांपूर्वी दोन अपघात झाले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू मार्केटच्या दोन्ही बाजूला असलेल्या एकेरी मार्गांवर सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी विरुद्ध वाहतूक होते. तेथेच रिक्षा स्टन्ड असल्याने या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी असते. हांडेवाडी व महंमदवाडी रस्त्यावरही हिच स्थिती आहे. बनकर क्रीडा मैदानाकडून मगरपट्टा रस्त्याने विरुद्ध दिशेने अनेक वाहने मगरपट्टा साउथ गेट चौकात येतात. त्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी होते. मगरपट्टा चौक व चंद्रमौलेश्वर महादेव मंदिरापासून सम्राट गार्डनकडे या वाहनांचा वेगही जास्त असल्याने अपघाताची स्थिती निर्माण होते. वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याठिकाणी उलट दिशेने… सय्यदनगर, हांडेवाडी रस्ता, पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मंडईलगतचे दोन्ही एकेरी मार्ग, मगरपट्टा चौक, मगरपट्टा साउथ गेट चौक, मुंढवा रेल्वे उड्डाणपुलालगत रासकर चौक, सातववाडी-गोंधळेनगर येथील सासवड रस्ता, सोलापूर रस्त्यावरील रुकारी पंप, जॉयविला, शेवाळवाडी फाटा चौक, अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समितीसमोरील रस्ता “उलट दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांवर गेली महिनाभरापासून कारवाई करीत आहोत. सुमारे ८०० ते ९०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी पोलीस नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे.” – राजेश खांडे, वाहतूक पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा.