Pune : व्हॉट्सअॅपला मेसेज पाठवून कंपनीला २६ लखांचा गंडा

पुणे : कंपनीचे मालक असल्याचे भासवून व्हॉटस्अॅपद्वारे सायबर चोरट्यांनी एका कंपनीला जवळपास २६ लाख रुपयांना टोपी घातल्याचे समोर आले आहे. या चोरट्याने कंपनीच्या अकाऊंटंटला संपर्क करित मिटींगमध्ये असल्याचे सांगून २५ लाख ९० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. दरम्यान, त्याने आणखी पैसे पाठविण्यास सांगितले असता, कंपनीच्या खऱ्या मालकाचा मेसेज अकाऊंटटला आला. त्यावेळी मालकाने असे कोणतेच पैसे पाठविण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी कंपनीची फसवणूक झाल्याचे अकाऊंटंटच्या लक्षात आले.
याप्रकरणी, कंपनीच्या वतीने ५५ वर्षीय व्यवस्थापकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे माळवाडी पोलिसांनी सायबर चोरांविरुधद विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ मार्च रोजी ऑनलाईन माध्यमातून घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मॅनेजर असलेल्या कंपनीत एक ४० वर्षीय महिला अकाऊंटट म्हणून काम पाहतात. त्या कंपनीत काम करत असताना, मालकाच्या नावाने त्यांना एक व्हॉटस्अप मेसेज आला. सुरुवातीला त्याने बॅलन्स विचारला. त्यानंतर मिटींगमध्ये असल्याचे सांगून २५ लाख ९० हजार रुपये रफिक अन्सारी नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात पाठविण्यास सांगण्यात आले.
मालकाच्या मेसेज प्रमाणेच तो मेसेज होता. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारची खात्री न करता विश्वास ठेवून पैसे पाठविले. परत या महिलेला १८ लाख ६० हजार रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. तेवढ्यात महिलेच्या मोबाईलवर मालकाचा तुम्ही कोठे आहात असा मेसेज आला. महिलेने इंटरकॉम करून मालकाशी संपर्क केला. तुम्ही सांगितलेले पेमेंट करून वरती येते असे म्हटले.
त्यावेळी मालकाने सांगितले की मी असे कोणतेच पेमेंट करण्यास सांगितले नव्हते. त्यावेळी कंपनीची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे करीत आहेत.




