आयुक्तांनी शहरातील समस्यांबाबतचे तब्बल अडीच हजार पुरावे दिले पुणे – शहरात कोणत्याही समस्या नसल्याचे कागदी अहवाल आयुक्तांच्या पुढ्यात मांडणाऱ्या विभाग प्रमुखांच्या डोळ्यांवरची झापड महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दूर केली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या अडचणी आणि समस्या तब्बल अडीच हजारांहून अधिक फोटोंच्या माध्यमातून सादर करीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले तसेच तातडीने या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहर स्वच्छता, अतिक्रमने, खराब रस्ते, ओव्हरहेड केबल, नाल्यांमधील कचरा, राडारोडा, पाणीपुरवठा, ड्रेणेज विभागाची अर्धवट चुकीची कामे, बाॅटल नेक, अनेक ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग अशा शेकडो समस्या आहेत. या समस्यांची माहिती करून घेण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून काम करीत असलेल्या ह्युमन मॅट्रिक्स या सल्लागार कंपनीला फोटोंसह या समस्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहाणी करून त्याचा अहवाल करण्याचे काम दिले होते. या अहवालातून समस्या समोर आल्या आहेत. या बैठकीस परिमंडळ उपायुक्त, १५ महापालिका सहायक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग. ड्रेणेज विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपस्थित होते. पुराव्यासह अहवाल सादरचे आदेश… या बैठकीत शहरातील रस्त्यांवर महापालिकेच्या चुकांमुळे होत असलेले बाॅटल नेक, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने झालेली ड्रेणेजची कामे, रस्त्यावर जागोजागी साठलेले कचऱ्याचे ढीग व राडारोडा, खासगी रिकाम्या मिळकतींमध्ये असलेले कचऱ्याचे ढीग, नाल्यांमध्ये पडलेली झाडे, ड्रेणेज, पाणी पुरवठ्याचे पाइप, अस्ताव्यवस्तपणे रस्त्यावर पडलेले पाइप, गर्दीच्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे क्राॅनिक स्पाॅट, रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे पोल. फिडर पिलर, रस्त्याकडेचा राडारोडा, अस्ताव्यस्तपणे लटकणाऱ्या ओव्हरहेड केबल, धोकादायक झाडे, रस्त्याकडेला पडलेला झाडांचा कचरा, अनधिकृत जाहीरात फलक, सार्वजनिक मिळकतींवर विद्रूपीकरण अशा वेगवेगळ्या प्रकारचे फोटोच आयुक्तांनी ठिकाणांसह दाखविले. त्यानुसार, या समस्यांचे निराकरण तत्काळ करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी संबधितांना दिले. तसेच, कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.