Pune : सिंहगड उड्डाण पुलासाठी आयुक्त उतरले मैदानात

पुणे : सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटरदरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले स्वतः या पुलाची पाहणी करणार आहेत. मात्र, पुलाच्या उद्घाटनाची तारीख अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
धायरीकडे जाणाऱ्या पूलाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून, केवळ पथदिवे लावणे बाकी असले, तरी ठेकेदाराकडून मागील महिन्याभरापासून या कामास उशीर केला जात आहे. त्यातच, पूलाचे काम पूर्ण होत असल्याने महापालिकेकडूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथाचे काम हाती घेतल्याने रस्ता आणखी अरुंद झाला असून, नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
हा पूल एकूण २१२० मीटर लांबीचा असून, शहरातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. भोसले यांनी सांगितले, की मी स्वतः उड्डाण पुलाची पाहणी करणार आहे. पूल सुरू केल्यानंतर जर काही त्रुटी आढळल्या, तर त्यावरून टीका होऊ शकते. म्हणून पाहणीपूर्वी सर्व गोष्टींची तपासणी करणे आवश्यक आहे. पाहणी अचानक केली जाईल आणि त्यानंतर पुलाच्या उद्घाटनाबाबत निर्णय घेतला जाईल.





