Pune : शहरातून थंडी गायब तापमानात वाढ

पुणे : कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे शहरातील थंडी गायब झाली असून, दिवसभर उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. १७) हवेली परिसरात सर्वात कमी १३.८ तर शिवाजीनगर परिसरात १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
शहरासह जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण, मध्येच अवकाळी पाऊस आणि तर काही भागात हलकी थंडी असा विचित्र हवामानाचा अनुभव पुणेकर घेत आहेत. त्यामुळे ९ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान १४ अंशाच्या पुढे गेले. परिणामी, शहरातील थंडी गायब झाली आणि उकाडा वाढला आहे. पहाटे दाट धुके पडत असून दुपारी उन्हाचा चटका बसत आहे.
दुपारनंतर शहराच्या काही भागात ढगाळ वातावरणामुळे हलकासा गारवा जाणवतो. मात्र, शहराच्या एका बाजूला गारवा तर दुसऱ्या बाजूला उकाडा असे वातावरण आहे. पुढील २४ तासांत शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील, कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
हवेली १३.८, माळीण १४.६, शिवाजीनगर १५.५, पाषाण १५.७, एनडीए १५.८, इंदापूर १६, भोर १७.७, लोणावळा १८.२, कोरेगांव पार्क १९.६, चिंचवड २०.१, मगरपट्टा २०.५





