Pune : पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. ९) घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ९ लाख ४४ हजार ४३४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, ६ हजार ४४९ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
भावी स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी होण्याच्या दृष्टीने ही शिष्यवृत्ती परीक्षा अत्यंत महत्त्वाची असून, शालेय जीवनात या शिष्यवृत्ती परीक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या परीक्षेत पात्र होणाऱ्या व गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते.
राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५ लाख ६६ हजार ३५३, तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ लाख ७८ हजार ८१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. परीक्षेसाठी एकूण ७६ हजार मनुष्यबळाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परीक्षेतील पेपर १ हा सकाळी ११ ते दुपारी १२.३०, तर पेपर २ हा दुपारी २ ते ३.३० या वेळेत होणार आहे.
या परीक्षेसाठी पुणे शहरात एकूण १०४ परीक्षा केंद्रे सुसज्ज आहेत. पाचवीसाठी ६१ केंद्र संख्या असून, आठवी साठी एकूण ४३ केंद्रे नेमून दिली आहेत. सर्व केंद्रे पुणे महापालिकेच्या समाविष्ट गावांसह तयार करण्यात आली आहेत. यात पाचवीचे १६ हजार ४४३ परीक्षार्थी, तर आठवीचे १२ हजार ४३५ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.
सर्व केंद्रांना परीक्षा साहित्याचे वाटप कै. वा. ब. गोगटे प्रशाला या शाळेतून करण्यात येत आहे. पुणे महापालिका शिक्षण विभाग उपायुक्त आशा राऊत, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, समग्र शिक्षा प्रकल्प अधिकारी डॉ. मनोरमा आवारे, महापालिका शिष्यवृत्ती विभागप्रमुख शरद मेमाणे यांनी तयारी केली आहे.





