प्रभात वृत्तसेवा पुणे – उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवणेतील सरस्वती नगर येथे मित्र पब्जी खेळताना एका तरुणाच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे या घटनेनंतर जबाबदारी झटकण्यासाठी मित्रांनी अल्पवयीन मित्रावर खोटा आरोप टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बनाव पोलिसांसमोर टिकू शकला नाहीजखमी तरुणाचे नाव संकेत संजय मोहिते ( २०, रा. सरस्वती नगर, शिवणे) असे आहे. त्याच्या उजव्या पायाच्या नडगीवर सोमवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास गोळी लागली होती. त्याला डेक्कनच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांच्या पथकाने रुग्णालयात धाव घेऊन चौकशी केली. यावेळी संकेत मोहितेने अल्पवयीन मित्र पिस्तुल दाखवताना गोळी चुकून लागल्याचा बनाव केला. तपासात हा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले. संकेत मोहिते, जाफर सादिक अली शेख (२०), पार्श्वनाथ शिरीष चाकोते (२५), वैभव लक्ष्मण धावडे (२२) आणि सागर प्रदीप कोठारी (२२) हे पाच मित्र जाफर शेख यांच्या घरी पब्जी गेम खेळत होते. यावेळी सागर कोठारी आपले पिस्तुल इतरांना दाखवताना लोड-अनलोड करत होता. पिस्तुल अडकल्याने पार्श्वनाथ चाकोतेने ते हाताळले आणि त्यातून अचानक गोळी सुटली. ही गोळी संकेतच्या पायावर लागली .घटनेनंतर घाबरलेल्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांना चुकीची माहिती दिली. गोळी कशी लागली याचे खोटे कारण सांगितले. या प्रकरणात पाचही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर करत आहेत.