प्रभात वृत्तसेवा पुणे – पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी शासनाने २०१९ मध्ये कंपनी स्थापन करण्यास मान्यता दिली.या कंपनीमध्ये १४ संचालक असणार आहे. कंपनीमध्ये सिडको, एमएडीसी पीएमआरडीए,एमआयडीसीचा समावेश आहे. २०१९ मध्ये शासनाने या संस्थांचा हिस्सा देखील निश्चित केला होता. त्यानुसार या कंपनीमध्ये सर्वाधिक ५१ टक्के वाटा हा सिडकोचा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा १९ टक्के आणि पीएमआरडीए व एमआयडीसीचे प्रत्येकी १५ टक्के हिस्सा निश्चित केला आहे. तसेच कंपनीच्या संचालक मंडळामध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापूर्वी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे कार्यकारी संचालक आणि वित्तीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. आता यात बदल करत शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे दोन प्रतिनिधींचा समावेश संचालक मंडळात केला आहे.पुरंदर नियोजित आंरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. एमआयडीसीमार्फत जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. एका बाजूला भूसंपादनाची प्रक्रिया सुरु असताना दुसऱ्या बाजूला पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीच्या संचालक मंडळाची फेररचना शासनाने केली आहे.