Pune City | स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांग उमेदवारांना दिलासा ; लेखनिक व सहाय्यकांची सोय अनिवार्य..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांग उमेदवारांना सोयीसुविधा नाकारल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत, राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागाने जारी केलेल्या नवीन सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, आता कोणत्याही दिव्यांग उमेदवाराने मागणी केल्यास संबंधित परीक्षा यंत्रणेला लेखनिक, वाचक किंवा प्रयोगशाळा सहायक उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.दिव्यांग उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने हे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, परीक्षा केंद्रे दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ आणि सुगम्य असावीत, तसेच त्यांचे परीक्षा केंद्र शक्यतो तळमजल्यावरच असावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
प्रामुख्याने ज्या उमेदवारांना लिहिण्यास अडथळा, किंवा ज्यांची लिहिण्याची गती कमी, त्यांना लेखनिक, वाचक किंवा प्रयोगशाळा सहायक पुरवला जाईल. या व्यतिरिक्त, इतर प्रकारच्या दिव्यांग उमेदवारांनी शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी किंवा अधीक्षकांचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही सुविधा उपलब्ध होईल. तसेच, परीक्षा यंत्रणाही आपल्या स्तरावर अशा सहायकांचे पॅनेल तयार करू शकतील. विशेष म्हणजे, परीक्षेच्या किमान दोन दिवस आधी उमेदवाराला आपल्या लेखनिकाशी प्रत्यक्ष भेटण्याची संधी दिली जाईल.परीक्षेदरम्यान पारदर्शकता जपण्यासाठी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग अनिवार्य केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत ऐनवेळी लेखनिक उपलब्ध न झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून एक राखीव पॅनेल तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच, एका विषयाच्या परीक्षेसाठी एकच लेखनिक वापरण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान, अंधत्व आणि शारीरिक दिव्यांगत्व असलेल्या परीक्षार्थींना लेखनिक, वाचक किंवा सहायक मिळवण्यासाठी वेगळे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, असेही या सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.





