पुणेकरांनो, तुम्ही घेताय शुद्ध हवा !

पुणे, दि. 27 – शहरात 2021 मध्ये सर्वाधिक 1 लाख 70 हजार 115 वाहनांची नोंद झाली आहे. मात्र, यातील जवळपास 94 टक्के वाहने “बीएस 6′ या श्रेणीतील तसेच 6219 वाहने बॅटऱीवरील असल्याने शहरात मागील वर्षी वायू प्रदूषणात घट झाल्याचा दावा महापालिकेच्या पर्यावरण अहवालात करण्यात आला आहे.
वाहनांच्या धुरापासून निर्माण होणारे तसेच हवा प्रदूषणाला करणीभूत ठरणारे सुक्ष्म धुलीकण (पीएम 10) आणि अतिसुक्ष्म धुलीकण (पीएम 2.5) यामुळे मागील वर्षभरात 365 दिवसांपैकी 141 दिवस समाधानकारक, 90 मध्यम, तर 2 दिवस खराब (सर्वाधिक प्रदूषित) हवेचे नोंदविले गेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शहरातील समाधानकारक हवेच्या श्रेणीच्या दिवसांमध्ये 2020 या वर्षापेक्षा वाढ झालेली असल्याने एका बाजूला शहरात नवीन वाहनांची नोंदणी वाढली असली तरी पर्यावरणपूरक वाहनांमुळे हवा प्रदूषण कमी झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. तर शहरातील वाहनांची संख्या 33 लाख 24 हजार 582 झाली आहे.
“बीएस 6′ वाहनांचाही हातभार
शहरात गेल्या वर्षभरात 1 लाख 70 हजार 115 वाहनांची नव्याने नोंद झाली आहे. त्यात 1 लाख 2 हजार 953 दुचाकी आहेत. तर 62 हजार 192 चारचाकी, तर 4 हजार 970 तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. या एकूण नोंदणी झालेल्या वाहनांमध्ये 1 लाख 60 हजार 998 वाहने ही बीएस 6 प्रकारातील आहेत. या प्रकारच्या वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये सल्फरचे प्रमाण तुलनेत कमी असते. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बीएस 6 ची वाहने बीएस 5 वाहनांच्या तुलनेत इंधनाच्या ज्वलनातून तयार होणाऱ्या धुरातून निर्माण होणाऱ्या सल्फरडाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन पेट्रोल वाहनात पाच पटीने कमी तर डिझेल वाहनात 3 पटीने कमी असते. याशिवाय हवा प्रदूषणाला जबाबदार असलेल्या नायट्रोजन ऑक्साईडचे 68 टक्के, तर धुलीकणांचे प्रमाण 82 टक्के कमी असते परिणामी या वाहनांमुळे शहरातील हवा प्रदूषण यंदा कमी झाल्याचा दावा पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून करण्यात आला आहे.





