Pune City | एचडीएफसी बँकेची ११.४७ कोटींची फसवणूक; बनावट कागदपत्रे आणि खोट्या तक्रारींचा पर्दाफाश

प्रभात वृत्तसेवा
पुणे – एचडीएफसी बँकेच्या फर्गसन कॉलेज रोड, पुणे शाखेची तब्बल ११.४७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मे. रोहित सर्व्हिस स्टेशन या फर्मचे भागीदार माणिक बिहाणी, सतीश भुतडा, तसेच जामीनदार व तारण देणारे रोहित बिहाणी यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी कौशिक सुरेश पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखा येथे दिलेल्या जबाबात नमूद केले आहे, की वरील आरोपींनी बँकेकडून पाच कोटींहून अधिक कर्ज घेतले असतानाही, गहाण ठेवलेली मालमत्ता परस्पर सुवर्णयुग सहकारी बँकेकडे तारण ठेवून तिथूनही कर्ज घेतले. हे सर्व एचडीएफसी बँकेच्या संमतीशिवाय व खोट्या एनओसीच्या आधारे करण्यात आले आहे.
रोहित सर्व्हिस स्टेशनने मार्च २०१७ मध्ये एचडीएफसी बँकेतून व्यवसायासाठी ओव्हरड्राफ्ट आणि मुदत कर्ज स्वरूपात ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कालांतराने कर्ज थकले आणि बँकेने ते एनपीए म्हणून वर्गीकृत केले. त्यानंतरही कोणतीही परतफेड करण्यात आली नाही. उलट बँकेच्या संमतीशिवाय गहाण ठेवलेली मालमत्ता परस्पर विकल्याचे व दुसऱ्या बँकेत तारण ठेवल्याचे निष्पन्न झाले.तपासादरम्यान हे देखील स्पष्ट झाले, की सुवर्णयुग सहकारी बँकेत कर्ज घेण्यासाठी एचडीएफसी बँकेची बनावट एनओसी सादर करण्यात आली होती, तसेच खोटी पोलीस तक्रार करून दस्तऐवजांची डुप्लिकेट प्रत मिळवून फसवणूक करण्यात आली. या सगळ्या प्रकारातून बँकेचे एकूण ११.४७ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.





