Pune Police : शहरातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत हरवलेला मोबाईल अवघ्या २० मिनिटांत शोधून काढत संबंधित महिलेला परत दिला आहे. या जलद कारवाईमुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. (Pune Police) वडगाव शेरी परिसरातील पुण्यनगरी आनंद पार्क येथे राहणाऱ्या श्रीमती काजल महेंद्र परिहार या रिक्षाने फिनिक्स मॉलकडे जात असताना त्यांचा मोबाईल रिक्षामध्येच पडला. फिनिक्स मॉल येथे उतरल्यानंतर मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ महात्मा फुले चौकी गाठून मदत मागितली. (Pune Police) यावेळी चंदननगर पोलीस स्टेशनच्या मार्शल ड्युटीवरील पोलीस कॉन्स्टेबल अमोल ढाकणे आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहित सूर्यवंशी यांनी त्वरित घटनास्थळाची माहिती घेतली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित रिक्षाचा नंबर शोधून काढला. त्यानंतर त्या नंबरच्या आधारे रिक्षा चालकाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. (Pune Police) पोलिसांनी परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर रिक्षा चालकाने सहकार्य करत मोबाईल परत करण्यास सहमती दर्शवली. अवघ्या २० मिनिटांत पोलिसांनी मोबाईल शोधून काढत श्रीमती काजल परिहार यांच्या ताब्यात दिला. (Pune Police) या जलद आणि प्रभावी कामगिरीबद्दल काजल परिहार यांनी पुणे पोलीस दलाचे तसेच चंदननगर पोलिसांचे मनापासून आभार मानत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख (चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे) यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस सदैव तत्पर असून अशा घटनांमध्ये जलद प्रतिसाद देणे हे आमचे कर्तव्य आहे.” (Pune Police)