Pune: कुलपती डॉ. बिबेक देबराय यांचाही राजीनामा

पुणे – गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे नवनियुक्त कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनीच पदाचा राजीनामा दिला. मात्र, त्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या कार्यकाळात संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती.
डॉ. देबराय यांची गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपतीपदी ५ जुलै रोजी नियुक्ती करण्यात आली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता होत नसतानाही डॉ. अजित रानडे यांची गोखले संस्थेच्या कुलगुरूपदी निवड झाल्याचा आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगाने डॉ. देबराय यांनी सत्य शोधन समिती नियुक्त करून समितीच्या अहवालानुसार त्यांनी डॉ. रानडे यांची कुलगुरूपदी झालेली नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
डॉ. देबराय यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून डॉ. रानडे यांनी आव्हान दिले. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत डॉ. देबराय यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता डॉ. देबराय यांनीच कुलपतीपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्च व्यक्त होत आहे.





