शेअर बाजार कोसळला! सेंसेक्समध्ये ११९० तर निफ्टीत ३६० अंकांची घसरण…

Share Market Update : भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. दिवसअखेर बीएसई सेंसेक्स ११९० अंकांनी पडून ७९०४३ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ३६० अंकांनी खाली आल्याने २३९१४ च्या पातळीवर स्थिरावला.
बँक निफ्टीची स्थिती
बँक निफ्टीमध्येही ३७० अंकांची घसरण झाली असून तो ५१९३० च्या स्तरावर बंद झाला. आज बीएसईवरील टॉप ३० कंपन्यांपैकी २९ कंपन्यांचे शेअर्स ‘रेड’ कॅन्डलमध्ये बंद झाले.
आयटी क्षेत्रावर मोठा परिणाम
बाजारामध्ये आज आयटी क्षेत्राला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ३.५० टक्के घसरण झाली, तर टीसीएस, एचसीएल टेक, अदानी पोर्ट यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स ३ टक्क्यांपर्यंत खाली आले.
रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये देखील पडझड झाली. संपूर्ण बाजारात पडझड होत असताना, एसबीआयच्या शेअर्सने मात्र थोडी स्थिरता टिकवून ठेवली.
घसरणीची प्रमुख कारणं काय? | Share Market Update
१. अमेरिकेतील फेड रेट कपातीची शक्यता
अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह कडून दर कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला. इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
२. रशिया-युक्रेन संघर्ष
रशियाने युक्रेनच्या ऊर्जा सुविधांवर मोठा हल्ला केल्याने भूराजकीय तणाव वाढला आहे. या तणावामुळे जागतिक बाजारावरही परिणाम दिसून येत आहे.
३. परदेशी गुंतवणूकदारांची माघार
अमेरिकन बाजारात जास्त परताव्याची अपेक्षा असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले आहेत. यामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला आहे.
गुंतवणूकदारांचं नुकसान | Share Market Update
या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. आजच्या घसरणीनंतर बीएसईचं मार्केट कॅपिटलायझेशन १.०७ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ४४३४०८९० कोटी रुपयांवर आलं आहे.





