Pune : अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे – पुणे व पिंपरी महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठीची इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी महाविद्यालयांना निर्देशही दिले आहेत.
राज्य मंडळाच्या वतीने पुढील आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या आधीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशासाठी http:11admission.org.in हे पोर्टल कार्यान्वित केले असून, विद्यार्थी नोंदणी येत्या २४ मे पासून सुरू करण्यात येणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी दिलेल्या संकेतस्थळास भेट देऊन वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निकालापूर्वी प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतली जाणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी येत्या २२ मे पासून ते राज्य मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल येईपर्यंत सुरू राहणार आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल नाही त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी मागील वर्षाच्या व्हेरीफाइड कॉपीसह स्वयंघोषणापत्र अपलोड करावे लागणार आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल आहे, त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी बदल करण्यापूर्वीच संकेतस्थळावरील माहितीची प्रिंट काढावी. आवश्यक बदल करून बदलांबाबतचे सर्व आदेश अपलोड करावेत. बदलानंतरच्या माहितीची प्रिंट काढावी व अपलोड केलेल्या कागदपत्रांची हार्ड काॅपी ५ जूनपूर्वी प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे.
नवीन कनिष्ठ महाविद्यालयाचे रजिस्ट्रेशन करावयाचे असल्यास त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव ३० मे पूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयात जमा करून लॉगीन आयडी मिळवावा व त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती भरून व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहावे. कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व ऑनलाइन प्रवेशाचे काम करणारी व्यक्ती यांच्यासाठी २४ व २५ मे रोजी प्रशिक्षण आयोजित केले असून, त्यास संबंधित प्राचार्यानी उपस्थित राहावे, असे केंद्रीय प्रवेश समिती सदस्य ज्योती परिहार यांनी स्पष्ट केले आहे.





