Pune : पूरप्रवण ३९ ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर

पुणे : पावसाळयात खडकवासला धरणसाखळीमधून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर अनेक भागात पूरस्थिती निर्माण होते. शहरातील अशा ३९ ठिकाणी स्मार्टपोल उभारून सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यावर ड्रोन कॅमेरा, सायरन तसेच माहितीसाठी छोटे स्क्रीन असणार आहे. ही सर्व यंत्रणा पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला जोडली जाणार आहे. त्यामुळे, पूरस्थिती उद्भवल्यास पालिका तातडीनं मदतकार्य पोहचवू शकेल.
शहरात गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणावर नदीत पाणी सोडले गेले. त्यातच अतिक्रमणांमुळे नदीपात्राची वहन क्षमता घटल्याने अनेक भागात पूरस्थिते उद्भवते. अशा वेळी माहिती नसल्याने पालिकेस तत्काळ मदत पोहचविता येत नाही. गेल्या वर्षी अशाच प्रकारे एकता नगरीत मोठा पूर आला होता. त्यानंतर, पालिकेने आपत्ती व्यवस्थापन सक्षम करण्यास सुरूवात केली.
त्याअंतर्गत पूरस्थितीवर अत्याधुनिक कॅमेरे आणि सुविधांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीत तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयांत २४ तास कार्यरत असलेले नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. आपत्तीच्या वेळी मदत कार्य तत्काळ सुरू होण्यासाठी २५ कर्मचारी तैनात केले असून सांडपाणी व जलसंपदा विभागात ९ अभियंत्यांची नियुक्ती झाली आहे. धरणांमधून विसर्ग सुरू झाल्यास ही माहिती पालिकेला तत्काळ कळवली जाणार आहे.
५०० स्मार्ट पोल, सायरन
शहरात ५०० स्मार्ट पोल उभारण्यात येणार असून त्यावर सायरन बसवले जाणार आहेत.सर्व पोलवर एआय तंत्रज्ञानावर आधारीत कॅमेरे असतील. यामुळे पूर, भूस्खलन, धरण विसर्ग किंवा इतर आपत्तींवेळी पालिकेस अर्लट मिळेल. यामुळे पालिकेस नागरिकांना सायरनद्वारे एकावेळी सूचना देता येतील. याशिवाय पालिकेकडून खडकवासला धरणसाखळीमधील धरणांवर स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा बसवण्यात आली असून, किती पाऊस झाला याचेही अर्लट पालिकेस मिळणार आहेत.
पालिकेत आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित केला आहे. पूरप्रवण भागात ३९ ठिकाणी सीसीटीव्ही, सायरन बसविले आहेत. ५०० सीसीटीव्ही आणि स्मार्ट पोल यंत्रणा बसवली जात आहे. कुठेही घटना घडली, तर तत्काळ प्रतिसाद दिला जाणार आहे. – संदीप खलाटे ( उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन कक्ष)





