GST Collection : जीएसटीचा पुन्हा विक्रम! सप्टेंबरमध्ये 2.03 लाख कोटींचे संकलन; महाराष्ट्र आघाडीवर
GST Collection : सप्टेंबर २०२६ मध्ये देशाचे जीएसटी संकलन १४.७ टक्क्यांनी वाढून २.०३ लाख कोटी रुपये झाले. महाराष्ट्राने सर्वाधिक २९,९८६ कोटींचा जीएसटी जमा केला.

GST Collection : देशातील वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन सप्टेंबरमध्ये १४.७ टक्क्यांनी वाढून २.०३ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. एप्रिल ते सप्टेंबर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण जीएसटी संकलन १२.४६ लाख कोटी रुपये झाले असून, त्यात वार्षिक आधारावर ११.६ टक्के वाढ झाली आहे.
रिफंड वजा केल्यानंतरचे निव्वळ जीएसटी उत्पन्न १८.१ टक्क्यांनी वाढून १.७६ लाख कोटी रुपये झाले. देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या सकल जीएसटीमध्येही १०.१ टक्के वाढ झाली आहे.
महाराष्ट्राचे संकलन सर्वाधिक –
राज्यांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक २९,९८६ कोटी रुपयांचा जीएसटी जमा केला. गेल्या वर्षीच्या २५,९७३ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात १५ टक्के वाढ झाली. कर्नाटकचे संकलन १३,८८४ कोटी, तर गुजरातचे १२,२२२ कोटी रुपये राहिले. उत्तर प्रदेश आणि तेलंगणाच्या संकलनात प्रत्येकी १८ टक्के वाढ झाली.
असममध्ये जीएसटी संकलनात तब्बल ८८ टक्के वाढ झाली. मणिपूरमध्ये १४५ टक्के वाढ नोंदली गेली. मात्र, सिक्कीम, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसह काही राज्यांमध्ये संकलन घटले. तमिळनाडूमध्येही ५ टक्के घट झाली.
तज्ज्ञांच्या मते, मजबूत देशांतर्गत मागणी, आयातीत वाढ आणि वस्तूंच्या किमती यामुळे जीएसटी संकलनाला आधार मिळाला. आयातीशी संबंधित जीएसटीमध्ये सुमारे २६ टक्के वाढ झाली आहे. मात्र, रिफंडमधील घट आणि जीएसटी दरकपातीचा परिणाम यावर आगामी काळात लक्ष ठेवावे लागेल. ७ ऑक्टोबरला होणाऱ्या जीएसटी परिषद बैठकीत पुढील सुधारणांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.





