पुणे : घराजवळच असणार आता कर्करोग उपचाराचे केंद्र

पुणे – महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण खूप असून, हृदयरोगानंतर कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. लॉकडाऊनमध्ये कॅन्सर बाधितांचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले असून, वेळेत उपचार न घेतल्याने अनेकांचा कॅन्सर शेवटच्या स्टेजला गेल्याची माहिती, सोमवारी तज्ज्ञांनी पत्रकार परिषदेत दिली.
“विन्का कॅन्सर क्लिनिक’ या कॅन्सर तज्ज्ञांच्या समूहाने “कार्किनोस’ या वैद्यकीय तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या संस्थेशी करार केला असून, त्यांच्याद्वारे शहरात चार ठिकाणी केमोथेरपी उपचार केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामुळे घराच्याजवळ लगेचच उपचार मिळणार आहेत. याशिवाय परदेशातील तंत्रज्ञानाप्रमाणे घरीच केमोथेरपी देता येईल का याविषयीही विचार सुरू असल्याची माहिती डॉ. राकेश निवे, डॉ. अश्विन राजभोज, डॉ. अमोल गायकवाड, डॉ. सारिका पाठक, डॉ. निखील शिरशी, डॉ. तुषार पाटील यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात अनेक रुग्णालयांनी केवळ कोविडवरच लक्ष केंद्रीत केले होते. त्यावेळी अन्य रोगांवरील शस्त्रक्रिया बंद होत्या. त्याचा फटका कॅन्सर रुग्णांनाही बसला. आता कॅन्सरवर होणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोचीमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, तेथे सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत. तंबाखू सेवनाने होणाऱ्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाणही खूप असल्याने त्यासंबंधीचे समुपदेशन केंद्रही सुरू करण्यात येणार असून, त्यासंबंधीची औषधेही या केंद्रांवर मोफत देण्यात येणार आहेत.
भारतीयांसाठी औषधनिर्मिती आवश्यक
कॅन्सरच्या औषधनिर्मितीमध्ये भारतीयांचा जनुकीय अभ्यास करण्यात येत आहे. आजपर्यंत कॅन्सरवरील औषधनिर्मिती ही परदेशातील औषध कंपन्यांनी केली आहे. परंतु त्यामध्ये पाश्चात्य देशांतील नागरिकांची जिनोमिक स्टडी करण्यात आली आहे. या औषधांचा भारतीयांच्या शरीरावर होणारा परिणाम तपासून, त्याप्रमाणे औषधनिर्मिती आवश्यक आहे. त्यादृष्टीने अभ्यास सुरू करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.





