प्रभात वृत्तसेवा पुणे – लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानातळावर पुन्हा विमान उड्डाण करतेवेळी विमानाच्या इंजिनला पक्ष्याची धडक बसल्याची घटना समोर आली. हा प्रकार पायलटच्या वेळीच लक्षात आल्यामुळे उड्डाण थांबविले आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, बर्ड हिटच्या वारंवार होणाऱ्या या घटनांमध्ये प्रवाशी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स १०९८ हे विमान पुणे विमानतळावरून भुवनेश्वरला बुधवारी (दि. ६) सायंकाळी उड्डाण करणार होते. या विमानामध्ये दीडशेपेक्षा अधिक प्रवासी होते. उड्डाणासाठी वेग पकडल्यानंतर विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनाला पक्षी धडकला. त्यामुळे इंजिनमध्ये गडबड असल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ विमानाचे उड्डाण थांबवले.त्याबाबतची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. उड्डाणानंतर हा प्रकार घडला असता, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर प्रवासीदेखील घाबरले. विमान धावपट्टीवरून पुन्हा पार्किंग बे मध्ये आणण्यात आले आणि भुवनेश्वरला जाणारे विमान रद्द केल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पुणे विमानतळावर बर्ड हिटच्या पाच वर्षांत १४५, तर २०२५ या वर्षात आतापर्यंत ११ घटना घडल्या आहेत. बुधवारी घडलेली ही बारावी घटना असून, त्याचबरोबर धावपट्टीवर कुत्रा येणे, बिबट्या, मोर दिसणे अशा घटना वाढत आहे. त्यामुळे हवाई दल, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया व पुणे मनपा या यंत्रणांनी आता तरी सुरक्षित विमानतळाबाबत अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे. अशा घटना घडू नयेत यासाठी एकसंघ व समन्वयाने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे हवाई वाहतूक तज्ञ्ज धैर्यशैल वंडेकर यांनी सांगितले.