pune : बाजीराव रस्त्यावर अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून

पंधरा वर्षांचा मुलगा मास्टरमाईंड; घटनेनंतर मध्यवस्तीत वाहतूक विस्कळीत
पुणे – शहराच्या मध्यवस्तीत दिवसाढवळ्या खुनाचा थरार उडाला. बाजीराव रस्त्यावरील नातूबाग परिसरात तिघा अल्पवयीनांनी एका १७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील पंधरा वर्षांचा मुलगा खुनातील मास्टर माईंड असल्याचे आढळून आले आहे.
मयंक सोमदत्त खराडे (१७, रा. सानेगुरुजीनगर, पीसीएमसी कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अभिजित इंगळे (रा. दांडेकर पूल) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तसेच, मध्यवस्तीतील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
ही घटना मंगळवारी (दि. ४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ ‘दखनी मिसळ’ समोर घडली. मयंक आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून आलेल्या तिघा आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी चेहऱ्यावर मास्क घातले होते. त्यांनी मयंकच्या दुचाकीला धडक देत त्याला खाली पाडले आणि तत्काळ धारदार कोयत्याने मयंकवर सपासप वार केले. मानेवर, डोक्यात आणि तोंडावर वार झाल्याने मयंक जागीच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात तो मृतावस्थेत पडला होता. हल्ल्यानंतर आरोपींनी वापरलेले शस्त्र घटनास्थळी टाकून दुचाकीवरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच गस्तीवरील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. खडक पोलिस ठाण्याचे पथक तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मयंकला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तो आधीच मरण पावला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही तासांतच तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. तिघेही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेनंतर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे तसेच खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.





