पुणे : तब्बल 800 क्विंटल तांदळाचा काळाबाजार रोखला

अवैध वाहतूक : जीएसटीच्या पावत्याही बनावट
सुमारे 1 कोटी रुपयांचे अन्नधान्य जप्त
गुन्हे शाखेच्या युनिट 2 ची तीन ट्रकवर कारवाई
पुणे – तब्बल 800 क्विंटल तांदळाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तीन ट्रकवर गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने हडपसर येथे कारवाई केली. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी तब्बल 97 लाख 44 हजारांचे तांदळाच्या पोत्याने भरलेले ट्रक यावेळी जप्त करण्यात आले.
युनिट 2 च्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले व कर्मचारी स्वारगेट हद्दीत पेट्रोलिंग करत फिरत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व कादीर शेख यांना तांदळाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची बातमी मिळाली. ते ट्रक हडपसर येथील 15 नंबर येथे येणार असल्याचेही त्यांना समजले.
शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास श्री कानकलक्ष्मी ऍग्रो ट्रेडर्स, जय आनंद फूड इंडस्ट्रीज आणि मुबारक ट्रासपोर्ट च्या मालकांनी अवैधरित्या शासकीय तांदूळ मिळवला होता. तसेच तो तांदूळ ते पांढरा, पिवळ्या व लाल अशा वेगवेगळ्या रंगाच्या पोत्यात भरून वाहतूक करत असताना आढळून आले.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी तांदूळ वाहतूक करण्यासाठी जीएसटीच्या बनावट पावत्या तयार केल्याचे आढळून आले. तीन ट्रकमध्ये रेशनिंगकरिता असलेला तांदूळ छुप्या पद्धतीने खुल्या बाजारात बेकायदेशीररित्या विक्री करिता खोपोली येथे जात असल्याची अधिकची माहितीही त्यांना तपासात समजली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार किशोर वग्गू, संजय जाधव, मोहसीन शेख यांनी केली.




