पुणे : मध्यवर्ती शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मुठा नदीवरील भिडे पूल २० ऑगस्टपूर्वी वाहतुकीसाठी सुरू करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी दिली. गणेशोत्सवास २७ ऑगस्टला प्रारंभ होत असून त्याच्या तयारीसंदर्भात पालिकेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मेट्रोच्या पादचारी पुलाच्या कामासाठी एप्रिलपासून हा पूल बंद आहे. हे काम जून महिन्यात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन होते. मात्र, महामेट्रोने यासाठी पालिकेकडे मुदतवाढ मागितली होती. भिडे पूल बंद असल्याने शनिवार पेठ, टिळक रोड, मंडई परिसरातून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा फेरा मारावा लागत आहे. परिणामी, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर वाहतूकीचा ताण वाढला आहे. त्यातच, गणेशोत्सवात अनेक प्रमुख रस्त्यांवर मंडळाचे मांडव असल्याने गर्दीमुळे रस्ते बंद करावे लागतात. परिणामी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते अशावेळी हा पूल छोटया वाहनांसाठी महत्वाचा ठरतो. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांकडूनही हा पूल उत्सवापूर्वी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत पूल गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे आश्वासन दिले.