Pune News : मेट्रोच्या कामासाठी भिडे पूल गुरुवारपासू दिड महिना बंद
Pune News : मुठा नदीवरील भिडे पूल गुरुवार, दि. १९ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत असा सुमारे दीड महिना वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Pune News : डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठांतील भागांशी जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी मुठा नदीवरील भिडे पूल सुमारे दीड महिना बंद ठेवण्यात येणार आहे. हा पादचारी पूल भिडे पुलावर बांधण्यात येत आहे. त्यासाठी वापरण्यात येणारे अवजड साहित्य पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune News)
त्यानुसार, गुरुवारपासून (दि. १९) सकाळी ६ वाजल्यापासून ३१ डिसेंबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यापूर्वीही पादचारी पुलाच्या कामासाठी भिडे पूल बंद करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतूककोंडी वाढल्याने दिवसा हा पूल नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला होता आणि पुलाचे काम रात्रीच्या वेळी केले जात होते. परिणामी, कामाचा वेग मंदावला होता. (Pune News0
गणेशोत्सवाच्या काळात डेक्कन स्थानकाला नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्त्यासारख्या भागांशी जोडणाऱ्या पादचारी पुलाची कमतरता नागरिकांना जाणवली होती. या बांधकामाधीन पुलामुळे या भागातील नागरिकांना तसेच शिक्षणासाठी या परिसरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक्कन मेट्रो स्थानकात ये-जा करणे सोपे होणार आहे. (Pune News)
पुलाचे काम सुरू असताना नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. भिडे पूल बंद असताना नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिजचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कालावधीत नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. (Pune News)
Pune News : नेहरूंची दूरदृष्टी आजही मार्गदर्शक : प्रा. विशाल पतंगे





