Pune Bengaluru Highway: पेठ नाका ते शेंद्रे मार्गावर महामार्ग प्रशासनाची ‘स्मार्ट नजर’; आता तिसरा डोळा ठेवणार प्रत्येक वाहनावर वॉच
Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावरील पेठ नाका ते शेंद्रे दरम्यान अत्याधुनिक डिजिटल देखरेख यंत्रणा; ६७ किलोमीटरच्या पट्ट्यात ६८ कॅमेऱ्यांचे जाळे.

Pune Bengaluru Highway – पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावरील पेठ नाका ते शेंद्रे या सहापदरीकरण होत असलेल्या मार्गावर अत्याधुनिक डिजिटल देखरेख यंत्रणा उभारली जात असून लवकरच या संपूर्ण पट्ट्यावर वाहनांच्या हालचालींवर रिअल- टाइम नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक नियमांचे पालन, अपघातांवर नियंत्रण आणि गुन्हेगारी घटनांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी ६७ किलोमीटरच्या अंतरात स्मार्ट कॅमेऱ्यांचे जाळे उभे केले जात आहे. महामार्ग प्रशासनाच्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत एकूण ६८ आधुनिक कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे.
त्यापैकी ३२ कॅमेरे बसविण्यात आले असून दोन कॅमेरे सध्या कार्यरत आहेत. प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये साधारणपणे एक किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले आहे. ही यंत्रणा वाहनांचा वेग, क्रमांक आणि संशयास्पद हालचालींची नोंद अचूकपणे करणार आहे. या संपूर्ण प्रणालीचे नियंत्रण कराड तालुक्यातील तासवडे येथील केंद्रीय नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे. महामार्गावर अपघात, वाहतूक कोंडी किंवा कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास संबंधित विभागांना तातडीने माहिती उपलब्ध होणार असल्याने मदतकार्याचा वेग वाढणार आहे.
याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची ओळख पटवून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करणेही शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, कॅमेऱ्यांसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी उभारलेल्या धातूच्या खांबावर डोम कॅमेरा आणि सौर पॅनेल बसविण्यात आले असून, बॅटरी व डेटा संचयन यंत्रणाही स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी देखरेख व्यवस्थेवर परिणाम होणार नाही.
राष्ट्रीय महामार्गांवर वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR), स्पीड मॉनिटरिंग आणि सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. पेठ नाका- शेंद्रे मार्गावरील ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास, वाहतुकीत अधिक शिस्त निर्माण होण्यास आणि प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





