Satara News: महामार्गावर अचानक थांबला पालकमंत्र्यांचा ताफा; उदयनराजेंची ‘ब्लॅक फॉर्च्युनर’ समोर आली आणि मग..

प्रभात वृत्तसेवा
सातारा – जिल्ह्याच्या राजकारणापासून थोडासा ब्रेक घेतलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी झालेली भेट चर्चेचा विषय ठरली. यावेळी उदयनराजे यांनी पालकमंत्र्यांना ‘जादू की झप्पी’ देऊन, महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.महामार्गावर पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा आणि त्यासमोर उदयनराजे यांची ब्लॅक फॉर्च्युनर ही गाडी महामार्गावरील वर्दळीतही लक्ष वेधून घेत होती.
राजकारणाच्या गप्पा मारल्यानंतर उदयनराजेंनी ‘कॉलेज लाइफच बरं होतं’ अशी टिप्पणी केल्याचे उपस्थितांनी सांगितले. सातारा पालिकेच्या निवडणुकीपासून उदयनराजे हे राजकीय हालचालींपासून दूर आहेत. पालिका निवडणुकीतही त्यांनी कुठेही सभा अथवा पदयात्रा केली नाही.आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे कराडवरून सातार्याकडे येत होते.
त्यावेळी त्यांची उदयनराजेंबरोबर भेट झाली. पालकमंत्र्यांनी वाहनांचा ताफा थांबवून, उदयनराजेंशी गप्पा मारल्या. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीसंदर्भात बैठक घेण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्याचे शंभूराज यांनी सांगताच, त्या संदर्भात त्यांच्याशीच बोलून घ्या, असे उदयनराजे यांनी इशारे करून सांगितले. शंभूराज देसाई यांना मिठी मारून, उदयनराजे पुन्हा गाडीत बसून निघून गेले.





