पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या २०२५-२६ या वार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिवाजीनगर न्यायालय आवारात मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मतमोजणीस होणार असून, रात्री उशिरा निकाल जाहीर होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. गिरीश शेडगे आणि अॅड. विजयराज दरेकर यांनी दिली.
तर अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. अमोल जाधव, अॅड. अनिल ऊर्फ अण्णासाहेब पवार, उप निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.प्रविण येसादे, ॲड. सुप्रिया कोठारी, अॅड.सचिन झालटे पाटील, अॅड.अतुल आर.पाटील, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.संदेश जायभाय, अॅड.प्रभाकर सोनावणे, अॅड.रामचंद्र चांदारे, अॅड.विकास उंद्रे, अॅड.हेमंत भांड, अॅड.कादंबरी दौंडे आणि अॅड.सचिनकुमार गेलडा काम पाहणार आहेत.
निवडणूकीसाठी मतदान करणाऱ्या वकिलांची अंतिम मतदार यादी ही प्रसिध्द झाली आहे. पुणे बार असोसिएशनचे ७ हजार ८३८ कायमस्वरूमी सभासद आणि २८२४ वार्षिक सभासद निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारी नामांकन अर्ज वाटप व स्विकृती १ ते ३ जानेवारी २०२५ या कालावधीत न्यायालयातील पुणे बार असोसिएशनच्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
४ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ५ नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. २८ जानेवारी रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत अशोका हॉल येथे उमेदवारांचे मनोगत असणार आहे. अध्यक्ष पदासाठी अनामत रक्कम २० हजार रुपये आहे. उपाध्यक्ष पदासाठी १५ हजार, सचिव पदासाठी १० हजार, खजिनदार, ॉडीटर पदासाठी ७ हजार, कार्यकारिणी सदस्य पदासाठी ३ हजार रुपये अनामत रक्कम आहे.




